मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

शुक्रवार, १० सप्टेंबर, २०२१

गजमुखास नैवेद्य अर्पण करा,दाखवू नका

 नैवेद्य *दाखवू* नका, *अर्पण* करा !


      सहजपणे उच्चारतो आपण, देवाला नैवेद्य दाखवला ! उद्या त्यानेही सुख फक्त "दाखवलं" तर ? मुळात त्याचंच घेऊन त्यालाच देतोय तर ते तरी दाखवण्यापुरतं नसावं, हो न ? मग हा नैवेद्य अर्पण कसा करावा ? सांगतो,

     सर्वात महत्वाचे म्हणजे जे अन्न आपण खाणार त्याच अन्नाचा नैवेद्य असावा. एरवी कोणी तोंडही लावणार नाही अशी बाजारातली पाच फळे देण्यापेक्षा घरात जे उत्तम असेल तेच ठेवा, फळंच हवीत असं मुळीच नाही.

   जेवणाचं ताट ठेवण्यापूर्वी बिनधास्त तो स्वयंपाक चाखून बघा, चुकून जर अळणी किंवा खारट असेल तर देवाने तसंच खायचं का ?

   आता हे ताट सगळं एकदम वाढू नका, तर घरातल्या व्यक्तीला वाढतो तसंच वाढा आणि तेवढंच वाढा. आता समोर बसून त्याला विचारा, बाप्पा, आवडलं का रे ? बघा, तो होच म्हणतो. दोन मिनिटांनी परत गरम तव्यावरील चपाती वाढा, आग्रह करा की एवढे मोदक संपवलेच पाहिजेत बाप्पा तू ! मधून मधून पेल्यात तांब्यातून पाणी ओतून प्यायला द्या. शेवटी वाफाळलेला भाताची मूद वाढून त्यावर गरम वरण, तूप वाढा. स्वतः लिंबाची फोड पिळा, बघा, चुकून बी तर नाही न पडली ! 

   आधी विचारा, बाप्पा पोट भरलं का रे, घेऊ का पान ? आणि मगच ताट उचला. ओलसर रुमालाने हलकेच बाप्पाचा उजवा हात आणि ओठ टिपून घ्या. असेल तर तांबूल पण द्या, किंवा स्वीट डिश म्हणून मस्त आईस्क्रीम सुद्धा ! 

    आता रोषणाई थोडी मंद करून बाप्पाला थोडी विश्रांती घेऊ द्या, तोवर आपली जेवणं होतील. 

   पानातल्या मेव्यापेक्षा मनातल्या भावाचा भुकेला आहे आपला बाप्पा ! त्याला दहा दिवसांत एकदा तरी असा जेवायचा आग्रह नक्की करून बघा, आणि पहा, आनंदाचे किती "मोद"क आपल्यालाच मिळतात ते !!


*दत्तगुरु*

🙏🏻🙏🏻😊😊😊

मोहन सोमलकर 🙏🍁

=============🌺=================🌺

४ टिप्पण्या:

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...